शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

बारावीच्या श्रेणीसुधार योजनेत बदल

बारावीच्या श्रेणीसुधार योजनेत बदल


इयत्ता बारावीसाठी असणाऱ्या श्रेणीसुधार (क्‍लास इम्प्रुव्हमेंट) योजनेत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बदल केला आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ऑक्‍टोबरमधील परीक्षेला न बसता थेट मार्च महिन्यात परीक्षा द्यायची असल्यास, त्यांना तशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्यासाठी मार्चमधील परीक्षेची ही शेवटची संधी असेल.

श्रेणीसुधार ही योजना राज्य मंडळाने काही वर्षांपूर्वी सुरू केली. याअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांची मिळालेली श्रेणी पुन्हा परीक्षेला बसून सुधारण्याची संधी दिली जाते. जी श्रेणी अधिक असते त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जातात. ऑक्‍टोबर आणि मार्च अशा दोन सलग संधी यासाठी दिल्या जातात. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी ऑक्‍टोबरऐवजी थेट मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेला प्रविष्ठ व्हायची परवानगी मंडळाकडे मागितली होती. त्यांची ही मागणी मान्य करत हा बदल करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत हा नियम पूर्वीपासूनच आहे. आता तो बारावीच्या विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात आला आहे, असे मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा